रायगड - कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन यंत्रणा अहोरात्र झटत आहे. ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या आशाताई, अंगणवाडी सेविका या देखील दारावर जाऊन कोरोनविषयी जनजागृती करून घरातच रहा असे आवाहन करीत आहेत. त्या पैकीच एक श्रीवर्धनमधील अंगणवाडी सेविका नंदिनी दिवेकर. त्या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या. कोणत्याही क्षणी प्रसुती होईल अशी स्थिती. त्यास्थितीतही त्या कोरोना बाबत जनजागृती करत होत्या. त्याच वेळी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून, त्यांनी बाळाला जन्म दिला आहे. साजमिक जबाबदारीचे भान ठेवून त्यांनी बजावलेल्या कर्तव्याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
कोरोना विषाणूसारखी राष्ट्रीय आपत्ती देशावर आली असून, ग्रामीण पातळीवरील आशाताई, अंगणवाडी सेविकांनी कामाचा वसा हाती घेतला आहे. श्रीवर्धनमधील नंदिनी दिवेकर ही महिला अंगणवाडी सेविका आहे. नंदिनी दिवेकर या कोरोनविषयी जनजागृतीसाठी घरोघरी फिरत आहेत. विशेष म्हणजे त्या गर्भवती होत्या. कोणत्याही क्षणी त्यांची प्रसूती होईल अशी स्थिती होती. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथील एका मोहल्यात आपले कर्तव्य बजावताना नंदिनी यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यावेळी त्याच्या सोबत असलेल्या अंगणवाडी सेविकेने नंदिनी हिस तात्काळ बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. नंदिनी हिची सुखरूप प्रसूती होऊन बाळास जन्म दिला. बाळ आणि नंदनी हे दोघेही सुखरूप आहेत.
कोरोना विषाणू बाबत जनजागृती करण्यासाठी जिगरबाज अंगणवाडी सेविका, आशाताई जिवाची बाजी लावत सेवा करीत आहेत. अशावेळी संचारबंदी लागू असताना फज्जा उडविणाऱ्या नागरिकांनी याचा विचार करणे गरजेचे आहे.