पनवेल - लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसांचाच कालावधी राहिल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलतात की काय? अशा घटना घडू लागल्या आहेत. पनवेलचे भाजप नेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा आज अनेक माध्यमांमध्ये होती. त्यामुळे पनवेलमधील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र, भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपण शरद पवारांना कधीही रीतसर भेटलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच निवडणुकीसाठी विरोधकांनीच हे षडयंत्र रचले असल्याचे म्हटले आहे.
मावळ मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे अक्षरशः मावळ मतदारसंघ पिंजून काढत आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे उभे आहेत. त्यामुळे या मतदार संघात शिवसेना-भाजप युती विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाइं आणि शेकाप महाआघाडी, असे चित्र पाहायला मिळत आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत तसे निवडणुकींच्या वाऱ्यांसह अफवेचेही वारे पनवेलमध्ये वाहू लागले आहेत.
भाजप नेते रामशेठ ठाकूर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली असल्याची चर्चा आज दिवसभर रंगली होती. मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याचे विविध तर्क-वितर्क लावले जात होते. त्यामुळे 'ईटीवी भारत'ने या गोष्टीतील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्यासोबत भेट घेतल्याची चर्चा ही केवळ अफवा आहे, असे सूचक वक्तव्य आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर माझी आणि भाजपची बदनामी करण्याचा हा प्रकार आहे, असा खुलासादेखील यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.
"माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि मी भारतीय जनता पक्षाचे आहोत. शिवसेना-भाजप-आरपीआय आणि मित्र पक्ष अर्थात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी खासदार म्हणून पाच वर्षे केलेली कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोणातून आम्ही कामाला लागलो आहोत. गेल्या महिनाभरात शरद पवार आणि आमची भेट झालेली नाही. पनवेल, उरण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व जवळपास नाही आणि त्यामुळे केवळ या निवडणुकीच्या निमित्तानं हे राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करतील, अशी चर्चा व्हायची आणि त्या माध्यमातून अफवा पिकवायची ही योजना विरोधकांनी केली आहे, असा खुलासादेखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच देशाचा विकास होऊ शकतो. हे पनवेल आणि उरण तालुक्यासह देशातील सर्वसामान्य जनतेला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे येत्या २९ एप्रिलला आपल्या युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय पक्का आहे. त्यांना मताधिक्य मिळवून देणे, हेच आमचे काम आहे. त्यांचा जोरदार प्रचार आम्ही करत आहोत आणि त्यांच्या पाठीशी उभी केली ताकद मतदानाच्या आकड्याच्या रूपाने निश्चितच दिसेल आणि श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार म्हणून लोकसभेत जातील, असा ठाम विश्वासदेखील यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. त्यामुळे विरोधकांकडून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनदेखील त्यांनी मतदारांना केले.