रायगड - पुन्हा लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली असल्याने, आदिवासी वाडीवरील हातावर कमवून खाणाऱ्या बांधवांसाठी पोलीस धावून आले आहेत. उरणमधील पुनाडे आदिवासी वाडीमधील कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करून, पोलिसातील माणसाचे दर्शन घडले आहे. यामुळे आपल्या व्यस्त कामातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोलिसांना येथील आदिवासी बांधवांनी सलाम केला आहे.
80 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप -
कोरोना रुग्ण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे हातावर कामावणाऱ्या आदीवासी बांधवांच्या चुली अन्नधान्याविना थंडावल्या आहेत. अशातच मदतीचा एक हात देवदूताप्रमाणेच असतो. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह, व पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई येथील "सेवासिरम" या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने उरण तालुक्यातील पुनाडे कातकरी वाडीतील जवळपास 80 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे व जेवणाचे वाटप केले आहे. लहान मुलांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले आहे. या अन्नधान्य वाटपासाठी पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2 शिवराज पाटील, सहपोलीस आयुक्त पोर्ट विभाग सचिन सावंत, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत तसेच उरण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारीवर्ग, "सेवासिराम" संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसातील माणसाला सलाम -
पोलीस व्यस्थ असतानाही सेवाभावी संस्थांच्या मदतीने अशाप्रकारे दुर्बल घटकांना विचारात घेऊन त्यांच्या मदतीसाठी जात असल्याने पोलिसांबाबत समाजामध्ये आदराची भावना व्यक्त होत आहे. हातावर पोट असणाऱ्या आदिवासी कुटुंबांना लॉकडाऊन परिस्थितीमध्ये उपासमारीची वेळ असताना, अशाप्रकारची मदत मिळणे हे फार मोठे कार्य आहे. यामुळेच या कार्यक्रमातून पोलिसातला माणसाचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. येथील कातकरी कुटुंबांनी मिळालेल्या मदतीने पोलिसातील या माणसाला सलाम केला आहे. "सेवासिरम" संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही भरभरून आशीर्वाद दिले आहेत.