रायगड - अलिबाग तालुक्यात परहूर पाडा येथे पोलिसांचा प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेला बंदुकीचा सराव हा नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची घटना कार्ले गावात घडली आहे. सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेली गोळी थेट डोंगराच्या पलीकडे असलेल्या कार्ले गावात एकाच्या घराच्या परीसरात असणार्या सिंटेक्सच्या पाण्याच्या टाकीत घुसली. त्याचवेळी बाजूलाच उभ्या असणार्या सहा वर्षीय मुलाच्या अगदी जवळून बंदुकीची गोळी गेल्याने तो थोडक्यात बचावला आहे.
दोन वर्षांनंतर पुन्हा कार्ले गावामध्ये अशा थराररक घटना घडण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सराव मैदान आणि गावाच्या मध्ये मोठी संरक्षक भिंत उभारून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गोळी घुसली पाण्याच्या टाकीत-
रायगडसह नवी मुंबई, ठाणे येथील पोलीस दलातील पोलिसांना बंदुकीचा सराव करण्यासाठी परहूरपाडा येथे प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. परहूरपाडा येथील डोंगरात हा सराव केला जातो. डोंगराच्या पलीकडे कार्ले गाव आहे. या गावात सव्वा दोनशे घराची वस्ती आहे. गुरुवारी पोलिसांचा अचूक निशाण्याचा सराव सुरू असताना एकाची गोळीचा नेम चुकून गोळी भरधाव वेगाने पलीकडे बसलेल्या कार्ले गावातील प्रवीण पाटील यांच्या अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीत घुसली. पाण्याच्या टाकीच्या बाजूला पाटील यांचा मुलगा आद्या उभा होता. त्याच्या जवळून गोळी जाऊन ती टाकीत घुसली. जोरदार आवाजाने बाजूला कपडे धुत असलेली आद्या याची आईही घाबरली. सुदैवाने मुलाला कोणतीही दुखापत झालेली नाही. पाण्याच्या टाकीत बंदुकीची गोळी सापडल्याने हा प्रकार उघड झाला.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण-
काही दिवसांपूर्वी गावातील अन्य ठिकाणीही गोळ्या सापडल्याने गावातील लोक एकत्र जमा झाले. त्यांनी तातडीने सदरची घटना अलिबाग पोलिसांना कळवण्यात आले. ताबडतोब अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी परिसराची पाहणी करून परहूरपाडा येथील प्रशिक्षण केंद्रावरही भेट दिली. तसेच बंदुकीची गोळीही ताब्यात घेतली. दोन वर्षांपूर्वी असा प्रकार सातत्याने घडत होता. त्यावेळीही घरात गोळया घुसल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यावर हा प्रकार बंद झाला होता. मात्र पुन्हा सदरच्या घटना घडू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा- प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान ही दुर्देवी घटना - राष्ट्रपती
हेही वाचा- केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून संसदेत २०२०-२१ आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर