रायगड - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश विदेशात दौरे करत असताना अलिबागच्या निसर्ग रम्य समुद्रकिनारी कोणत्याही सुरक्षेशिवाय फेरफटका मारताना पाहायला मिळाले. यावेळी त्यांचे निवडक सहकारी देखील त्यांच्यासोबत होते. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. मात्र, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे कच्छचे लालजी देवरीया होते. लालजी यांनी काल दुसऱ्यांदा अलिबागला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढणे अशक्य असल्याने हुबेहूब दिसणारे लालजी याच्यासोबत फोटो काढण्याची हौस भागवून घेतली.
लालजी यांनी स्थानिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टाईलने फोटो काढले. यावेळी 'ईटीव्ही भारत'शी त्यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्याच्यासोबत फोटो काढण्याची सर्वांना इच्छा असते. मात्र, ते देशाचे पंतप्रधान असून ते शक्य नाही. मात्र, गुजरातच्या कच्छ येथील लालजी देवरीया हे हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसतात. त्यामुळे, त्यांना चांगलीच प्रसिद्ध मिळाली आहे. आज कुठेही गेले तरी त्यांना नरेंद्र मोदी यांची छबीच समजतात. दरम्यान, काल लालजी देवरीया अलिबाग येथे आले होते. येथे देवरीया यांनी समुद्र किनारी आणि बाजारात फेरफटका मारला. त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.
लालजी देवरीया हे प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजनेचे उपाध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे देवाने मला बनवले. याबाबत मी देवाचे आभार मानतो. लहान मुले असो वा मोठे, भेटले की मोदी समजून फोटो काढतात. मलाही त्याचा आनंद वाटतो. नरेंद्र मोदी यांच्यावर निघालेल्या 'नमो सो गंमो' या सिनेमात आपण काम केले आहे. त्याचबरोबर, वेब सिरीजमध्येही काम करत असल्याचे लालजी देवरीया यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. लालजी देवरीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात भाषणही बोलून दाखविले.
हेही वाचा- अलिबागची बालकलाकार आर्या मोरे 'सावित्रीजोती' मालिकेत साकारतेय 'ही' भूमिका