पेण-रायगड: गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर, चेतक एंटरप्रायजेस, एमईपी सांजोस इत्यादी कंत्राटदारांना महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण केलेले नाही. अनेक ठिकाणी मार्ग दाखविण्यासाठी दिशादर्शक फलक, नामफलक, खुणा, सिग्नल यंत्रणा उपलब्ध नाहीत. पेण शहरात जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत.
वाशी विभागातील गावांकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग केलेला नसल्याने या विभागातील वीस ते पंचवीस गावे व वाड्यातील जनतेला जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावालागत आहे. याठिकाणी पण कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. या महामार्गावरील दुभाजकाची अवस्था देखील दयनीय आहे. दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलेले नाही. अनेकांनी आपल्या फायद्यासाठी दुभाजक तोडून बेकायदेशीर मार्ग तयार केले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील पेण ते वडखळकडे जाणा-या सर्व्हिस रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांचे तसेच प्रवाशांचे हाल होत आहेत. माञ अधिकारी तसेच प्रशासन याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वडखळकडे जायला मळेघर पुलाखालून जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता बनवण्यात आला आहे. मात्र दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे.
पेण बाजूकडून वडखळकडे जाणा-या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रामवाडी येथील वडखळकडे जाणारा सर्व्हिस रस्ता देखिल अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे एसटी बस व इतर वाहने खाचरखिंड येथून विरुध्द बाजूला जावे लागत असल्याने अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर कांदळेपाडा येथील सर्व्हिस रस्ता हा देखील अद्यापि पुर्ण झालेला नाही.
सदर रस्त्यासाठी ज्या मालकाची जागा संपादित करण्यात आली आहे त्याला त्याचा मोबदला देखिल देण्यात आला आहे. परंतु तरीही त्या जमिन मालकाने तो अडवून धरल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच या सर्व्हिस रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून पुर्ण झालेला नाही. महामार्गावरील इतर सर्व्हिस रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र वाशीनाका, मळेघर ते पुढे वडखळकडे जाणां-या सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरणाचे काम का केले जात नाही ? असा सवाल वाहन चालक व प्रवासी करत आहेत.
पेणसह कोकणातील पत्रकारांनी चौपदरीकरणासाठी महत्वपूर्ण लढा दिल्या नंतर मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाले खरे, मात्र सदर मुंबई - गोवा महामार्गाचे काम मागील दहा बारा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. मात्र अनेक ठिकाणी दिशा दर्शक फलक, नामफलक नाहीत यामुळे वाहन चालकांचा गोंधळ होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस रेडीयम रिप्लेक्टर, दिशा निर्देशक फलक बसविणे गरजेचे आहे. अशी माहिती वाहन चालक वैभव धुमाळ यांनी या संदर्भात बोलताना दिली.