रायगड - प्लास्टिकमुक्त महापालिका म्हणून राज्यातील पहिली महापालिका असलेली पनवेल महापालिकेची प्लास्टिकविरोधी कारवाईने पुन्हा जोर धरला आहे. प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्याकरिता आधी स्वतःपासून सुरुवात व्हावी, म्हणून पनवेल शहराचा गाडा हाकणारे पनवेल पालिका मुख्यालयच आधी प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नुकतीच एक मोहीम राबविण्यात आली. यात प्लास्टिक वापरल्यास नागरिकांवर कारवाई करण्यात आली. तसेच प्लास्टिकमुक्त पनवेल करण्याआधी प्लास्टिकमुक्त पालिका करण्याच्या या अनोख्या मोहीमेत जवळजवळ 10 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अन्य राज्यातील ट्रक चालकांना नो एंट्री
पनवेल महापालिकेत 'स्वच्छ भारत अभियाना'च्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिकमुक्त मुख्यालय करण्यासाठी ही मोहीम सुरू केली. विभागात काही प्लास्टिक असेल तर १५ ऑक्टोबरपर्यंत हे प्लास्टिक काढून टाकण्याचे ठरले होते. कर्मचाऱ्यांना १५ ऑक्टोबरपासून प्लास्टिक वापरू नये, असा आदेश दिल्यामुळे आरोग्य विभागाने महापालिकेत प्लास्टिकविरोधी मोहीम राबविली.
हेही वाचा - राष्ट्रपती कोविंद दोन दिवस नाशिक दौऱ्यावर; रुद्र-नाद संग्रहालयाचे करणार उद्घाटन
स्वच्छ भारत अभियानाच्या वरिष्ठ सल्लागार मधूप्रिया आवटे यांनी स्वतः महापालिकेत प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. या मोहिमेत मिनरल वॉटरचा पुन्हा पाणी भरून उपयोग केल्यासही दंड आकारण्यात येईल, अशी सूचना दिली होती. तसेच जेवणाचे डबे, थर्माकोल, साहित्य ठेवण्यासाठी प्लास्टिकची वेष्ठण कार्यालयात ठेवण्यास सक्ती केली होती. ४००हून अधिक कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.
हेही वाचा - जुन्या वादातून डॉक्टरचे अपहरण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे नोकर जेरबंद
मात्र, तरीदेखील प्लास्टिकची सवय लागलेल्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये भांडार, लेखा, चालक कक्ष, नगरसचिव कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, पर्यावरण आदी विभागांत १० जणांवर कारवाई करण्यात आली. शिस्तभंगाची कारवाई म्हणून प्रत्येकाकडून १५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. महापालिका क्षेत्रात आपण कारवाई करतो, तर मग आपले घर स्वच्छ का करू नये, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे स्वच्छ भारत अभियानाच्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे यांनी सांगितले.