रायगड - राज्यात प्लास्टिक बंदी लागू होऊन दोन वर्षे झाली. यानंतरही अनेक शासकीय कार्यालयात प्लास्टिक बाटल्यांचा सर्रास वापर होतो. मात्र याला रायगडचे जिल्हाधिकारी कार्यालय अपवाद ठरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठका, पत्रकार परिषदवेळी आता प्लास्टिकच्या बाटल्या हद्दपार करण्यात आल्या आहेत. याजागी स्टीलच्या बाटल्यांचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्लास्टिक मुक्त करण्याकडे पाऊल पडले आहे.
राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदी लागू केली. मात्र प्लास्टिक बंदीला अजून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचे चित्र नाही. परंतु, आता शासकीय इमारत पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करून जिल्हाधिकाऱ्यांनी नवा पायंडा पाडला आहे.
हेही वाचा - शिक्षकाने गाण्यातून दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत केले असून त्यांनी कार्यालयात प्लास्टिकच्या बाटल्या हद्दपार केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात स्टीलच्या बाटल्यांमधून पाणी देण्यात येत आहे. याचा आदर्श घेऊन इतर शासकीय कार्यालयांमध्येही प्लास्टिकविरोधी भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले आहे.