रायगड - जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी आज आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी तसेच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
जिल्हाधिकारी यांनी स्वतः बैठक घेतल्याशिवाय उठणार नाही, असा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. यावेळी पोलीस व आंदोलनकर्त्यामध्ये बाचाबाचीचा प्रसंग उद्भवला. दिव्यांगांच्या विविध मागण्यांची पूर्तता करणे आणि दिव्यांग हक्क कायदा २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे ६ फेब्रुवारी २०१९ रोजी स्मरण पत्र दिले होते. या स्मरण पत्रात स्वयंरोजगारासाठी २०० चौरस फूट जागा मिळावी, ५ टक्के निधी योग्य मार्गाने पूर्ण खर्च करावा, दिव्यांगासाठी घरकुल योजना द्यावी, जिल्ह्यातील कंपनीमध्ये रोजगारासाठी शासनाकडून आदेश द्यावे, बँकेकडून अर्थसहाय्य मिळण्यास मदत करणे, दिव्यांगांच्या संस्थांना भूखंड देणे, आधारकार्ड सक्ती करू नये,
दिव्यांगासाठी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करणे, दिव्यांगांना स्वतःच्या उत्पन्नाचा दाखला मिळावा, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिव्यांगांना ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र द्यावे, या मागण्या स्मरण पत्रात दिल्या आहेत. या स्मरण पत्रात सर्व जिल्हा प्रशासकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी आणि मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी या स्मरण पत्राद्वारे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशींना केली होती. मात्र, याबाबत कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे आज संघटनेच्या शेकडो अपंग कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, अधिकारी व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांची भेट घ्यायला पाठवले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः इथे यावं, असा पवित्रा घेतला होता. मात्र, काही वेळाने आंदोलनकर्ते कार्यालयातून बाहेर पडले.