रायगड – गर्भवती पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असताना मुंबईतील रुग्णालयातून पतीने तिच्यासह पळ काढून कोकणातील आपले गाव गाठले आहे. यामुळे परिसरात भीताचे वातावरण असून संबंधित पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मुंबईतील सोमय्या रुग्णालयात एका गर्भवती महिलेवर उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी केईएम किंवा नायर रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र एका व्यक्तीने कोरोनाबाधित पत्नीला घेऊन पळ काढला अन् महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले आपले करमर हे गाव गाठले. हे जोडपे गावात पोहचल्यावर त्यांची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे करमर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पतीचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून या जोडप्याला महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले आहेत.
मुंबईतून कोरोनाबाधित गर्भवती पत्नीला घेऊन पतीने गाठले गाव, महाड तालुक्यात खळबळ महाड तालुक्यातील करमर गावातील हे जोडपे मुंबई येथे राहते. पत्नी गर्भवती असून तिला सोमय्या रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. तिची कोरोना तपासणी केली असता 18 मे रोजी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे रुग्णालयाने पुढील उपचारासाठी केईएम अथवा नायर रुग्णालयात तिला घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र पतीने रुग्णालयात पत्नीला पुढील उपचारासाठी न नेता आपल्या बाईकवरून थेट करमर गाव गाठले. त्यानंतर गावात गेल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना तपासणी करण्यास सांगितले. महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये तपासणी करून पेपर तपासले असता पत्नी पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर पतीचाही स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी पाठविला आहे. पती-पत्नी या दोघांना महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करून घेतले आहे. मात्र या जोडप्याने कोरोना पॉझिटिव्ह असताना प्रवास करून आपले गाव गाठले असल्याने याबाबत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. या दाम्पत्याच्या या हलगर्जीपणाचा त्रास मात्र आता करमरच्या ग्रामस्थांना सहन करावा लागणार असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.