रायगड - गौरी गणपती विसर्जनानंतर कोकणात गेलेले चाकरमानी आता परतण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर परतीला निघणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. माणगाव महामार्गावर ४ ते ५ किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तर, वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
गौरी गणपतीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमानी 7 सप्टेंबर रोजी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर आज मुंबईकडे परतायला लागले आहेत. लोणारे ते माणगाव या दरम्यान चाकरमानी प्रवाशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोंडी झाली असली तरी त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे वाहनांची वाहतूक कोंडी झाली असल्याने वाहतूक पोलिसांतर्फे माणगाव निजामपूरमार्गे कोलाड तसेच पाली खोपोली मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झालेली आहे.