रायगड - निसर्ग चक्रीवादळ होऊन 28 दिवस झाले. मात्र, अद्यापही नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. ज्यांना मदतीची खरी गरज आहे तेच आज नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. शासनाकडून पावणेचारशे कोटी निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तसेच पंचनामे देखील झाले आहे. अद्याप नुकसान भरपाई का मिळत नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच या नुकसान भरपाईमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने परत सविस्तर पंचनामे करावे, अशी मागणीही केली जात आहे.
जिल्ह्यात 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ घोंघावत आले. दोन ते तीन तासांत होत्याचे नव्हते झाले. करोडोची हानी झाली. हजारो कुटुंब बेघर झाली. बागायतदार पुरता कोलमडून गेला. त्यानंतर मुख्यमंत्री, मंत्री, नेते मंडळी, केंद्रीय पथक यांचे दौरे झाले. शासनाकडून तातडीने पावणे चारशे कोटी रुपये निधी देण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. 90 टक्के घराच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास आलेल्या मंत्र्यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई अनुदान चेकचे वाटपही करण्यात आले. मात्र, ज्याच्या खात्यात आधीच लाखो रुपये असून त्याची घरे दोन वर्षांपासून पडून आहेत, अशा नागरिकांना प्रशासनाने दीड ते दोन लाखांचे वाटप केले आहे. मात्र, ज्याचे खरच नुकसान झाले आहे, असे हजारो नुकसानग्रस्त आजही अनुदानाची वाट पाहत आहेत. त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने पुन्हा एकदा याबाबत शहानिशा करून पंचनामे करावे आणि नुकसानग्रस्त नागरिकांना अनुदान द्यावे, असे स्थानिक विश्वास धुरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
शासनाने प्रथम प्राधान्य म्हणून घराच्या नुकसानीसाठी 242 कोटी 84 लाख रुपये निधी जिल्हा प्रशासनाला दिला. तसेच पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त घरमालकांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे नक्की भरपाई मिळेल की नाही? असा प्रश्नही आता नुकसानग्रस्त विचारू लागले आहेत.