रायगड - अलिबागच्या नारंगी गावातील डॉ. मनोज पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. पंधरा दिवस कोरोना बरोबर लढाई करून डॉ. पाटील हे सुखरूप आपल्या घरी आले आहेत. त्यावेळी गावकरी आणि नातेवाईकांनी वाजतगाजत व फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. कोरोनाला कमी लेखू नका, नियमांचे पालन करा आणि कोरोनाला हरवा, असा संदेश डॉ. पाटील यांनी सर्वांना दिला आहे. आपल्या परिसरातील कोरोना रुग्णांसाठी स्वत:च्या मल्हार रुग्णालयातच कोविड सेंटर उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ. मनोज पाटील यांचे नारंगी येथे क्लिनिक आहे. दहा किलोमीटर परिसरात ते एकटेच डॉक्टर असल्याने सर्व नागरिक त्याच्याकडे उपचारासाठी येतात. रुग्णांवर उपचार करताना डॉ. मनोज पाटील यांना कोरोनाची बाधा झाली. स्वतः डॉक्टर असल्याने ते क्वारंन्टाईन राहिले होते. मात्र, त्यांच्या पत्नीलाही लागण झाली. पत्नीवर स्वतः उपचार करून त्यांनी तिला बरे केले.
पाटील यांना थायरॉईड असल्याने त्यांची तब्येत नाजूक झाली. त्यामुळे त्यांना नवी मुंबई येथे डी. वाय पाटील रुग्णालयात दाखल केले गेले. तेथे त्यांना दहा दिवस आयसीयूमध्ये ठेवले होते. अखेर पंधरा दिवसानंतर डॉ. पाटील यांनी कोरोनावर मात केली व ते सुखरूप घरी आले.
डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांनी डॉक्टर असल्याचा धर्म निभावला. ते उपचार घेत असताना एका रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. मात्र, एकही बेड उपलब्ध नसल्याने डॉ. पाटील यांनी स्वतःचा बेड त्या रुग्णांसाठी उपलब्ध करत त्या रुग्णाचे प्राण वाचवले. कोरोना काळात अनेक खासगी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देण्यास नकार दिला आहे. मात्र, डॉ. मनोज पाटील हे कोरोना काळातही ग्रामस्थांना नित्यनेमाने सेवा देत आहेत.