खालापूर (रायगड) - कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थी घरी बसून मोबाइल व्हिडिओद्वारे शिक्षण घेत आहेत. असे असतानाही संपूर्ण वर्षाचे शुल्क भरण्यासाठी शाळा व्यवस्थापन सक्ती करत आहे. यामुळे पालकांनी अनेकदा शाळा व्यवस्थापकांशी चर्चा केलेली आहे. तरीही शाळा व्यवस्थापन आडमुठ्या धोरणावर ठाम असून शुल्क भरण्यासाठी पालकांना तगादा लावत आहेत. यामुळे खोपोलीतील कारमेल स्कूलच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पालक संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत 20 फेब्रुवारी रोजी बोलताना दिला आहे.
कारमेल पालक संघर्ष समितीने शनिवार (ता. 20) रोजी खोपोली मुस्लीम कम्युनिटी सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अॅड. संजय धावारे, महेश काजळे, सुरेश दिघे, संदीप वाघमारे, संजय भारती, रशीद शेख, रविंद्र अवथनकर, जयदेव देशमुख, नितीन शेजवल, विनोद माखेचा, प्रमोद गायकवाड, संजय कचरे यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होते.
पालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
टाळेबंदी काळात उद्योगधंदे बंदमुळे अनेकांच्या नोकऱ्यांसह व्यवसायही बुडाले आहेत. पालकांवर आर्थिक संक्रात ओढवली असताना खोपोलीतील कारमेल शाळेने विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क पूर्ण भरण्यात यावे, यासाठी पालकांवर दबाव आणण्याचा प्रकार सुरू केल्याने ऑनलाईन शिक्षण देत असताना फक्त शिकवणी वर्गांचे शुल्क घ्यावे, अशी विनंती करत वार्षिक शुल्कात सवलत मिळावी, अशी विनंती पालक वारंवार करत आहेत. मात्र, शाळा प्रशासनाने आपली भूमिका ठाम ठेवत सर्व शुल्क भरावे लागेल, अशी भूमिका घेतल्याने पालक वर्ग आक्रमक झाला आहे. ५० टक्के शैक्षणिक शुल्क माफ केले नाही तर, कारमेल स्कूलविरोधात पालक संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती अॅड. संजय धावारे, महेश काजळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.