ठाणे - पनवेलमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महापौर निवडीसाठी वेळ असला तरी मात्र महिला नगरसेवकांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीमध्ये फूट पडली असली तरी नव्याने उदयाला येणाऱ्या महाशिवआघाडीचा परिणाम पनवेल महापौरपदाच्या निवडणुकीवर होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा - राज्यापालांच्या काळ्या टोपीने शेतकऱयांचा घात केला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्याचा आरोप
पनवेल महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा भाजपचाच महापौर होणार असल्याचे दिसत आहे. सध्या पनवेलचे महापौरपद महिला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने डॉ. कविता चौतमोल महापौरपदी विराजमान आहेत. त्यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपणार असल्याने नुकत्याच झालेल्या सोडतीमध्ये हे महापौर पद खुल्या गटाच्या महिला वर्गाकडे गेले आहे. त्यामुळे या पदासाठी देव पाण्यात ठेवलेल्या पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांची महाशिवआघाडी उदयास येत असली तरी पनवेलमध्ये मात्र या निवडीत भाजपच्या नगरसेवकांपेक्षा अर्ध्यापेक्षाही कमी संख्या आघाडीत आहे. तसेच राज्यात महाशिवआघाडी येत असली तरी पनवेल महापालिकेत सेनेचा एकही नगरसेवक नसल्याने महापौर निवडीत भाजप आणि आघाडी यामध्ये महापौर निवडणूक रंगणार आहे.
त्यातही पनवेल महापालिकामधील पक्षीय बलाबल पाहिले असता भाजप- 51, शेकाप - 23, काँग्रेस - 2, राष्ट्रवादी काँग्रेस- 2 असे एकूण 78 नगरसेवक आहेत. त्यामुळे महाशिवआघाडी जरी आली तरी भाजपची एकहाती सत्ता आणि महाशिवआघाडीकडे नसलेले संख्याबळ यावरुन पनवेलचा महापौर हा भाजपचाच असणार हे स्पष्ट असले तरी या पदासाठी पक्षात चुरस असल्याने या पदावर कुणाची वर्णी लागते याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
भाजपमध्ये महापौर पदासाठी खुल्या गटातील महिला इच्छुकांची संख्या मोठी आहे. यापूर्वी उपमहापौर चारुशीला घरत या प्रमुख दावेदार असल्या तरी दर्शना भोईर, खारघरमधून लीना गरड, संजना कदम, नेत्रा पाटील रोडपाली येथील प्रमिला पाटील या नगरसेविकांनीही आपल्या गॉडफादरमार्फत फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना ठाकूर कुटुंबियांना चांगलीच दमछाक होणार आहे.
यापुढे पनवेल महापौरसाठी मैदानात असलेल्या खुल्या गटातील महिलांचे समीकरण पाहिलं असता, शेकापच्या 9 तर भाजपच्या 14 अशा एकूण 23 खुल्या गटातील महिला आहेत. आता यापैकी कोणत्या महिलेच्या डोक्यावर पनवेल महापौर पदाचे मुकुट विराजमान होणार, हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे पनवेल महापालिकेत रामशेठ ठाकूर कुटुंबाचे वर्चस्व आहे, मात्र महापौरपदाच्या या सोडतीमुळे महापौरपदासाठी इच्छूक असलेल्या नाईक व ठाकूर कुटुंबाला पहिल्यांदा अनुसूचित महिला आणि आता खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षीत झाल्यानं महापालिकेतील सत्तेच्या चाव्या कुटुंबबाह्य व्यक्तीच्या हाती सोपवाव्या लागणार आहेत. याला पर्याय म्हणून ठाकूर कुटुंबीय आपल्या कुटुंबातील महिलेला राजकारणात उतरवून महापालिका आपल्या हातात घेतली, अशी ही चर्चा रंगताना दिसून येत आहे.
हेही वाचा - VIDEO : 'तेरी गलियों में न रखेंगे कदम' जितेंद्र आव्हाडांचा भाजपला सुरेल टोला