रायगड - नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी आज मतदान होत आहे. पनवेलमधील प्रभाग 19 ब मधील जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सपत्निक मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत भाजपकडून अपेक्षेप्रमाणे मुग्धा लोंढे यांच्या जागेवर त्यांची कन्या रुचिता लोंढे हिला उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याच्या पॅटर्नप्रमाणेच पनवेलच्या या पोटनिवडणुकीत देखील महाविकास आघाडीनं आपला उमेदवार उभा केला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रमिला कुरघोडे यांची कन्या स्वप्नल कुरघोडे या देखील पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
एकूण 34 मतदान केंद्रावर ही पोटनिवडणूक पार पडतेय. या पोटनिवडणुकीला सकाळी 9 वाजेपर्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. दुपारी थोड्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढली. दुपारी 12 नंतर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदाराची गर्दी झाली होती. प्रभागातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देण्यात यावी, असे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह दिवंगत नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या आणि भाजप-आरपीआयच्या उमेदवार रुचिता लोंढे यांनी देखील हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेत सहपरिवार मतदानाचा हक्क बाजवला. भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक होईल, अशी अपेक्षा असतानाच महाआघाडीकडून अनपेक्षितरीत्या सेनेचा उमेदवार उभा केल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.