रायगड - कांदा निर्यातीला केंद्र सरकारला बंदी घातल्याने राज्यातील निर्यातदारांना फटका बसला आहे. विदेशात पाठविण्यासाठी कंटेनर भरून आणलेले तीनशेहून अधिक कांद्याचे कंटेनर गेल्या तीन दिवसांपासून जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत. त्यामुळे दीडशे निर्यातदारांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागणार आहे.
राज्यात चालू हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. विदेशातही महाराष्ट्रातील कांद्याला मागणी असते. त्यामुळे व्यापारी राज्यातील कांदा खरेदी करून निर्यातदारांमार्फत कंटेनरद्वारे जेएनपीटी बंदरातून विदेशात पाठवित असतात. त्यामुळे शेतकऱ्यालाही कांद्याला चांगला भाव मिळत असतो. मात्र, केंद्र सरकारने अचानक सोमवारी रात्री कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचे आदेश काढले आहेत.
जेएनपीटी बंदरातून विदेशात कांद्याची निर्यात केली जाते. मुंबई व नवी मुंबई येथील दीडशे निर्यातदार यांनी राज्यातून खरेदी केलेला कांदा जेएनपीटी बंदरात तीनशेहून अधिक कंटेनरद्वारे पाठविण्यासाठी सोमवारी आणला आहे. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याने सर्व कंटेनर हे जेएनपीटी बंदरात उभे आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी न दिल्यास कांदा सडून निर्यातदारांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्राने त्वरित निर्यात करण्यास परवानगी द्या, अशी मागणी निर्यातदार करीत आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. तसेच कांदा उत्पादकांनी निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.