मुंबई-कोरोनाच्या भीतीने मुंबईतील अनेक खासगी क्लिनिक, दवाखाने लॉकडाऊन झाले आहेत. कुलाबा परिसरातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. यावर शिवसेनेने एक चांगला पर्याय शोधून काढला आहे, तो म्हणजे वनरुपी क्लिनिकचा. उद्यापासून कुलाब्यात वनरुपी क्लिनिक सुरू होत असून पुढच्या दोन महिन्यांसाठी ही सेवा असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानंतर ही खाजगी डॉक्टर आडमुठी भूमिका घेऊन आहेत. सुरक्षिततेच्या उपाय योजना पुरवल्याशिवाय दवाखान्याचे शटर उघडणार नाही यावर ते ठाम आहेत. यामुळे कुलाबा परिसरातील सर्व दवाखाने, क्लिनिक बंद असून रुग्णांचे हाल होत आहे. सेंट जॉर्ज आणि जीटी हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णांसाठी बंद झाल्याने या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
दक्षिण मुंबईचे शिवसेना प्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी वनरुपी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलाबा मार्केट येथील सेनेच्या शाखा क्रमांक 225 येथे दोन महिन्यांसाठी हे क्लिनिक सुरू करण्यात येत असल्याची माहिती सपकाळ यांनी दिली आहे.
वनरुपी क्लिनिकचे संचालक डॉ राहुल घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्लिनिक कार्यरत राहणार आहे.सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8 येथे ओपीडी सेवा सुरू राहणार आहे. या ठिकाणी रुग्णांना औषधेही पुरवली जाणार आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या या वनरुपी क्लिनिकमुळे आता या परिसरातील नागरिकांना-रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.