रायगड- जिल्ह्यातील नेरळ येथील नारळवाडी, कळंब याठिकाणी बकरी पालन व्यवसायाच्या नावाखाली चक्क रक्तचंदनाचा अवैध साठा करून तस्करी करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे विभागाने छापा टाकून तीन जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे विभागाने केलेल्या या कारवाईत 3750 किलोग्रामचे रक्तचंदन आणि साहित्य असा मिळून 1 कोटी 88 लाख 12 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात लाकडाची किंमत पाचपट आहे. या गुन्ह्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरळ येथील नारळवाडी, कळंब येथे मुंबईत राहणारा आरोपी याचा बकरी पालन फार्म हाऊस आहे. हा फार्म हाऊस नावालाच असून तेथे रक्तचंदन तस्करी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून आधी त्या जागेची रेकी करण्यात आली. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ याच्याशी चर्चा करून स्थानिक गुन्हे पथकाने सापळा रचून छापा टाकला.
बकरी पालन व्यवसायाच्या आडून चाललेले काळे धंदे आणि फार्म हाऊसमध्ये रक्तचंदन लपविण्यासाठी केलेली योजना पाहून काही काळ पोलीस पथक ही भांबावून गेले. बकरी पालन फार्म हाऊसमधील मोकळया जागेमध्ये साधारण 22 मीटर लांबीचा, 02 मीटर रूंदीचा व दिड मीटर खोलीचा सिमेंट काँक्रीटचा भला मोठा खड्डा तयार केला होता. त्या संपूर्ण खड्डयावर लोखंडी अँगल टाकून वर फरशी टाकून त्यावर पुन्हा माती अंथरली होती. त्यामुळे या खड्डयावर जंगली गवत उगवले होते आणि त्या खडड्यामध्ये 'रक्तचंदन' या संरक्षित वृक्षाच्या लाकडाचे भले मोठे ओंडके लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
फार्म हाउसमध्ये एक दुमजली बिल्डींग असून त्या बिल्डींगमधील खोल्यांमध्ये 14 इंची इलेक्ट्रिक कटर, इलेक्ट्रिक करवत व इतर अवजारांच्या मदतीने त्या लाकडाचे ओंडके कापून, त्यावरील साल काढून ते व्यवस्थित पॅक करून तस्करीकरिता पुढे पाठविण्यासाठी तयार करण्यात आले होते.
पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात 3,750 कि.ग्रॅम इतक्या वजनाचे एक कोटी, 87 लाख, पन्नास हजार रूपये इतक्या किंमतीचे वेगवेगळया आकारमानाचे व लांबी, रूंदीचे 'रक्तचंदन' या संरक्षित वृक्षाचे लाकडी ओंडके जप्त केले आहेत. तसेच बासष्ट हजार 200 रूपये किंमतीचे इतर साहित्य असे एकूण एक कोटी 88 लाख 12 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तीन आरोपींकडे पोलीस कोठडी दरम्यान 'रक्तचंदन' या संरक्षित वृक्षाची लाकडे कोठून आणली ? त्यांची विक्री कोठे करणार होते ? या चंदनाच्या लाकडांची तस्करी कशा प्रकारे केली जाते ? यामध्ये आणखी कोण, कोण सहभागी आहे? अशा विविध मुदद्यांवर आरोपींकडे तपास सुरू करण्यात आलेला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे, पोलीस हवालदार सुभाष पाटील, सागर शेवते, भानुदास कराळे, पोलीस नाईक विशाल आवळे, पोलीस शिपाई संदीप चव्हाण आणि पोलीस शिपाई अनिल मोरे यांच्या पथकाने व वन विभागाचे वनपाल ए.बी.घुगे व त्यांच्या पथकाच्या मदतीने कारवाई पार पाडली आहे.