रायगड - चोरी आणि घरफोड्या करणारी परराज्यातील एक टोळी रायगड पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्वी पकडली होती. या कारवाईत पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता जिल्ह्यातील इतर 9 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. तर, 7 लाख 11 हजार 729 रुपये किमतीचे 26 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. सदर माहिती आज(30 ऑगस्ट) रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे आरोपी देशातील विविध राज्यात जाऊन चोऱ्या आणि घरफोड्या करत असत. त्यांनी मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील विवीध भागात अनेक चोऱ्या आणि घरफोड्या केल्या आहेत. मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या भागात रहाणारे हे आरोपी चोरीसाठी एकत्र येत होते. सुरवातील बसने प्रवास करून ते राज्यात दाखल होत असत. त्यानंतर जंगलात कींवा निर्जन ठिकाणी मुक्काम करत असत. मध्यरात्री चोऱ्या करूत ते मिळेल त्या वाहनाने पुन्हा गावाकडे निघून जायचे, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यात या टोळीने अनेक ठिकाणी चोरी केली होती. यात माणगाव, कोलाड, महाड, रोहा, नागोठणे येथील एकुण 9 घरफोड्यांचा समावेश आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे सुनिल मुझालदा आणि रवी उर्फ छोटू डावर या दोन आरोपींना मध्यप्रदेश मधून ताब्यात घेण्यात आले होते. सखोल चौकशीनंतर त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबूली दिली आहे. या आरोपींवर रायगड सह रत्नागिरी, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत. त्यांचे साथीदार अद्यापही फरार असून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक त्यांच्या मागावर आहे, अशी माहितीदेखील पारस्कर यांनी यावेळी दिली.