रायगड - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सातही मतदार संघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारांना पितृपक्ष संपण्याची प्रतिक्षा असल्याने सोमवारपूर्वी उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता नाही.
अर्ज भरण्याची मुदत 4 ऑक्टोबरपर्यंत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्षात नवीन कार्याची सुरुवात करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यास पुढे येत नाहीत. 28 तारखेला पितृपक्ष संपत आहे. रविवारपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी आहे. सोमवारपासूनच उमेदवार आपले अर्ज दाखल करतील असा अंदाज आहे.
हेही वाचा - अलिबाग येथील नर्सिंग महाविद्यालयाचे काम सहा वर्षानंतरही अपूर्णच; कोट्यवधीचा निधी खर्च
शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप या प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार ठरवले आहेत. मात्र, यादी अद्याप जाहीर केलेली नाही. शिवसेना-भाजप युतीची घोषणादेखील झालेली नाही. यामुळे उमेदवार आणि त्यांचे समर्थक संभ्रमात आहेत.
उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासोबत फक्त 4 व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कक्षात प्रवेश मिळणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून 100 मीटर अंतरापर्यंत प्रवेशास निर्बंध घालण्यात आले आहेत. या परिसरात घोषणाबाजीही करता येणार नाही, अशी माहिती अलिबागच्या निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी दिली.