रायगड - निसर्ग चक्रीवादळ हे रायगडच्या अलिबागजवळ मुरूड किनाऱ्यावर धडकले आहे. त्यामुळे अलिबागेत मुसळधार पाऊस सुरू झाला असून जोरदार वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडाची पडझड झाली आहे. रेवदंडा येथील साळाव पूल हा वाहतुकीस बंद केला असून अलिबाग रेवदंडा रस्ताही झाड पडल्याने बंद झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर झाड कोसळले असल्याने ही वाहतूकही ठप्प झाली आहे, तर समुद्रकिनारी जाणारे रस्तेही बंद करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी वादळी वारा आणि मुसळधार पाऊस असल्याने बाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
थळबाजार येथील साधारण दीड हजार कोळीबंधव नागरिकांना थळ ग्रामपंचायत इमारत, शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. तर या सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 11 हजार 260 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे.