रायगड- निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील नागरिकांच्या घराचे, बागायतीचे नुकसान झाले. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, समाजमंदिर, स्मशानभूमी शेड यांनाही या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, स्मशानभूमी शेड पुन्हा उभे राहणे महत्वाचे आहे. यासाठी ग्रामपंचायतीने लोकसहभागातून घेऊन मनरेगाच्या माध्यमातून नुकसान झालेल्या वास्तू पुन्हा उभ्या करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील विविध भागात तीन हजार शाळा, अंगणवाडी, गावातील समाजमंदिर, स्मशानभूमी शेड, भिंत कोसळून नुकसान झाले आहे. शाळा, अंगणवाडी नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांचा शाळेत बसण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजमंदिरही अनेक ठिकाणी कोसळले आहेत. स्मशानभूमी शेडही कोसळल्याने नागरिकांना पावसाळ्यात अडचण निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत भवनचेही काही ठिकाणी नुकसान झाले आहे. गावातील या महत्वाच्या वास्तू पुन्हा उभे करणे हे एक प्रशासनासमोर आव्हान आहे. मनरेगा योजनेतून ही कामे होऊ शकतात. यासाठी नागरिकांनी एकत्रित येऊन ही कामे केल्यास लवकरच या वास्तू सुस्थितीत येऊ शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मनरेगा योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून दुरुस्तीच्या या कामास प्रारंभ केल्यास नागरिकांनाही कामाचे पैसे मिळू शकतात आणि गावातील शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर लवकरच सुस्थितीत होण्यास मदत मिळू शकते.
वादळानंतर वीज पुरवठ्याचे काम करण्यासाठी नागरिक स्वतःहून बाहेर पडले आणि त्यांनी काम केले. त्यामुळे विजेचा प्रश्न लवकर सोडण्यास मदत मिळाली. जिल्ह्यात मनरेगा कामाबाबत उत्साह नसला तरी या संकटकाळात नागरिकांनी एकत्रित येऊन जर हे काम मनरेगामधून केल्यास त्यांनाच फायदा होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी मनरेगामधून निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या वास्तू लोकसहभाग घेऊन कामे पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व ग्रामपंचायतींना केले आहे.