रायगड - अलिबाग तालुक्यातील तळवडे गावातील मुंबई पोलीस दलात असलेल्या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर त्याच्या संपर्कातील 28 नातेवाईकांचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये कोरोनाबाधित पोलिसाच्या सहा वर्षीय मुलाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली. त्यामुळे, आता अलिबागमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.
अलिबाग तालुका हा कोरोनामुक्त असताना सर्वजण निर्धास्त होते. मात्र, मुंबई पोलीस दलात असलेल्या तलवडे येथील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रामराज मोरोंडे येथे एक कमानी कंपनीत असलेला व्यक्ती कोरोनाबाधित आढळला. अशात आता पोलिसाच्या सहा वर्षांच्या मुलाचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या या मुलाला पनवेल येथे उपचारासाठी दाखल केले गेले आहे.
तलवडे आणि मोरोंडे येथे आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे दोन्ही गावे ही कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केली आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाची लागण होत असल्याने अलिबाग तालुक्यात सध्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.