रायगड - जिल्ह्यातील अलिबाग-पेण रस्त्यावरील धरमतर खाडीत १०० वर्षांपासून येथील ग्रामस्थ एकत्र येऊन नारळी पौर्णिमेचा सण साजरा करत आहेत. सणानिमित्त धरमतर पुलावरुन दीडशे ते दोनशे फुटावरुन समुद्राला विसर्जन केलेला नारळ येथील तरुण मुले खाडीत उड्या मारुन बाहेर काढतात. हा नारळ पकडण्याचा खेळ पाहण्यासाठी हजारो ग्रामस्थ व पर्यटक याठिकाणी गर्दी करत असतात.
कोळी-आगरी समाज नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. ते या दिवशी समुद्राला नारळ वाहून समुद्र शांत होण्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर हे लोक मासेमारीसाठी आपली बोट समुद्रात नेतात. जिल्ह्यातील धरमतर खाडीतही कोळी-आगरी समाजातील बांधव एकत्र येऊन नारळ टाकतात. यावेळी धरमतर पुलावर उभे असलेले ग्रामस्थ १ ते १० नारळ खोल समुद्रात टाकतात. त्यावेळी पुलावर उभे असलेले तरुण एका मागून एक उडी मारुन ते नारळ वाहत्या पाण्यातून गोळा करतात. हा जीवघेणा खेळ पाहण्यास हजारो नागरिक गर्दी करतात.
धरमतर खाडीवर पूल नव्हता तेव्हा जेटीवरुन नारळ टाकले जात असत, ते पकडण्यासाठी ५ ते ६ जण उड्या मारत होते. मात्र, १९६२ मध्ये धरमतर पूल बांधल्यानंतर व आता नवीन पूल झाल्यानंतर या पुलावरुन दीडशे ते दोनशे फूट खोल पाण्यात येथील जिगरबाज तरुण उड्या मारुन समुद्रातात टाकलेले नारळ पाण्यातून बाहेर काढतात. हा खेळ सायंकाळपासून ते रात्र होईपर्यंत सुरू असतो. मारवाडी समाजाचे लोक आल्यानंतर या खेळाला अजून रंग चढतो, असे स्थानिक नागरिक पद्माकर पाटील सांगतात .
खाडीतून काढलेले नारळ एकत्र गोळा करुन गावदेवीच्या देवळात त्याचा नारळीपाक केला जातो. हा नारळीपाक सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे प्रसाद म्हणून ग्रहण करतात. नारळी पौर्णिमेदिवशी खेळला जाणारा हा खेळ जोखमीचा असला तरी पट्टीचा पोहणाराच उडी मारुन हे धाडस करीत असतो. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने खाडीत बोटीची सुविधा ही केलेली असते. त्यामुळे १०० वर्षात एकदाही येथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.