रायगड : चक्रीवादळ किंवा मुसळधार पाऊस पडला की वीज जाते. तौक्ती चक्रीवादळ येणार असल्याने महावितरणने जिल्ह्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित केला होता. तौक्ती चक्रीवादळाने पंधरा तासांहून अधिक तास जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. मात्र वादळ सुरू असताना, वीजेची तार तुटल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरण कर्मचारी आणि अधिकारी यांनी अशाही परिस्थितीत भर पावसात आणि वादळी वाऱ्यात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
महावितरण विभाग वादळात होते सज्ज
तोक्ती चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवली होती. त्यामुळे महावितरण विभागाला सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले होते. वादळ काळात वीज सुरू ठेवल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. विजेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वादळाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील वीज पुरवठा महावितरण मार्फत खंडित करण्यात आला होता. तर वादळ काळात कोरोना रुग्णाला विजेमुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
जिल्हा रुग्णालयातील वीज पुरवठा झाला होता खंडित
अलिबाग जिल्हा सामान्य आणि जिजामाता हे कोविड रुग्णालय असल्याने याठिकाणी कोरोना रुग्णवर उपचार केले जात आहेत. तौक्ती चक्रीवादळ काळात कोरोना रुग्णांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यात आला होता. तर जनरेटर बॅकप सुविधा रुग्णालयात ठेवण्यात आली होती. वादळामुळे सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील वीज तारा कोसळून वीज पुरवठा खंडित झाला होता.
भर पावसात आणि वाऱ्यात कर्मचाऱ्यांनी बजावली आपली भूमिका
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाल्याचे कळताच अलिबाग महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू असतानाही, महावितरण कर्मचाऱ्यांनी आपली सेवा चोख बजावली आहे. भर पावसात आणि वाऱ्याच्या संकटातही महावितरण कर्मचाऱ्यांनी तुटलेली तार जोडून वीज पुरवठा सुरळीत सुरू केला आहे.
हेही वाचा - Tauktae Cyclone : राज्यात 6 जणांचा मृत्यू, तर 9 जण जखमी