रायगड - गेल्या आठवड्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. अलिबाग, पेण तालुक्यांत ८५० उच्चदाब वाहिन्या, २,७०० लघुदाब वाहिन्या आणि ५७ ट्रान्सफॉर्मर पडले आहेत. जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचारी कार्यरत असून नागरिकांचीही मदत घेतली जात आहे.
जिल्ह्यातील असुम उसर सोडता सर्वच उपकेंद्रे सुरू झाली आहेत. आतापर्यंत अलिबाग, पेण शहर, रेवस, सांगाव येथील फिडर सुरू करण्यात आले आहे. या भागातील वीजपुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल, अशी माहिती अलिबाग-पेणचे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांनी दिली. नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ : शरद पवार उद्या रायगड दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी
निसर्ग चक्रीवादळाने नागरिकांच्या घरांचे, बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरण विभागालाही वादळाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात अनेक भागात विजेचे पोल, तारा, ट्रान्सफॉर्मर कोसळले आहे. जिल्ह्यातील वीजयंत्रणा पूर्णतः कोलमडून गेली आहे. वादळानंतर जिल्ह्यात सगळीकडे अंधार पसरला असून वीजपुरवठा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच मनुष्यबळ कमी असल्याने जिल्ह्यात बाहेरील 20 जणांच्या दोन टीम सोबतीला येणार असल्याची माहिती तपासे यांनी दिली आहे.
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळामुळे संसार उघड्यावर; किहीम आदिवासी पाडा मदतीच्या प्रतिक्षेत
अलिबाग तालुक्यात आक्षी, नागाव, चौल रेवदंडा भागात मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी उसर फिडरवरून आठवड्याभरात वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे तपासे यांनी सांगितले.