रायगड - अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे यांनी तळा तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर शेतीचे पंचनामे करून भरपाई देण्याबाबत सूचना केल्या.
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी - अण्णा हजारे
पावसाळा संपला असला तरी अजूनही परतीचा पाऊस जिल्ह्यात सुरूच आहे. हाता तोंडाशी आलेले सोन्यासारखे भातपीक पावसाने वाहून गेले आहे. पावसामुळे पिकाला कोंब आले आहेत. त्यातच शासनाकडून पंचनामे करण्यास उशिर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडला आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात साधारण दोनशे गावे अवकाळी पावसाने बाधित झाले असून साधारण 1618 हेक्टर क्षेत्र भातशेतीचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार अदिती तटकरे यांनी तळा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी महसूल, कृषी अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. अधिकाऱ्यांना शेतीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या अशा सूचना आमदार अदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हेही वाचा - राजकीय धामधुमीत शरद पवार शेतकऱ्याच्या बांधावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा