रायगड - तौक्ती चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रायगड दौऱ्यावर आले. यावेळी पेण येथे वादळात झाड पडून मृत्यू झालेल्या रामा कातकरी यांच्या घरी जाऊन त्यांच्या जखमी झालेल्या पत्नीची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर माणगाव तालुक्यातील वाढवण गावातील सीताराम शेलार यांच्या वादळात पडझड झालेल्या घराची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर ते महाडकडे रवाना झाले.
हेही वाचा - मंत्री विजय वडेट्टीवार, रामदास आठवले आज रायगडात
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज वादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी रायगडात दाखल झाले. पेण, माणगाव, महाड या ठिकाणी त्यांनी नुकसान झालेल्या भागांची आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबांची भेट घेतली. पेण तालुक्यातील गगोदे बुद्रुक या गावातील रामा कातकरी यांचा चक्रीवादळात अंगावर आंब्याचे झाड पडून मृत्यू झाला होता. यावेळी त्यांची पत्नी चित्रा कातकरी यासुद्धा जखमी झाल्या होत्या. आठवले यांनी आज रामा कातकरी यांच्या पत्नीची सांत्वनपर भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी त्यांची चौकशी करून शासनाकडून मदत मिळाली का? याबाबत विचारणा केली. आठवले यांनी त्वरित अधिकाऱ्यांना मदत देण्याबाबत सूचना केल्या आहेत. अधिकाऱ्यांकडून पंचनाम्याबाबत माहितीही आठवले यांनी घेतली.
माणगाव वाढवण गावाला दिली भेट
आठवले यांनी माणगाव तालुक्यातील वाढवण गावात झालेल्या घराच्या नुकसानीची पाहणी केली. सीताराम शेलार यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. शेलार यांच्या घराची पाहणी आठवले यांनी केली. तालुक्यात दोन घरांची पडझड झाली असून 296 घरांची अंशतः पडझड झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंत्री रामदास आठवले याना दिली. त्यानंतर ते महाडकडे रवाना झाले.
हेही वाचा - तौक्तेचा फटका : वादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यांना भरीव मदत द्या - देवेंद्र फडणवीस