रायगड - कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त असलेल्या एका व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल आज (बुधवारी) निगेटिव्ह आल्याने त्या व्यक्तीला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जीवनावश्यक सुविधा सुरू राहणार असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील परदेशवारी करून आलेल्या एका व्यक्तीला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर मुंबई येथील भाभा हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या व्यक्तीला सुरुवातीला मुंबई येथील कस्तुरबा हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या कोरोनाबाधित रूग्णावर डाॅक्टरांनी केलेल्या उपचारामुळे आज त्याचे सॅम्पल रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर एका कोरोनाबाधित रूग्णावर कस्तुरबा हाॅस्पिटलमधील विलगीकरण कक्षात अजूनही उपचार सुरू असून, त्यालाही लवकरच डिस्चार्ज मिळेल, अशी आशा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केली.
एका रूग्णाच्या करोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रूग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी न करता आपण कोणत्याही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला त्याची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले आहे.