महाड (रायगड) - महाडच्या पुरामध्ये नुकसान झालेल्या औषध विक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुरामध्ये पाण्यात भिजलेल्या औषधांचे काय करायचे? हा मोठा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. याबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश आले नसल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
औषधांबाबत शासनाने तत्काळ निर्णय घ्यावे -
मुसळधार पावसामुळे 22 जुलैला महाड वासियांना पुरपरिस्थितीला सामोरे जावे लागले होते. या पुरामुळे अनेक घरांचे तसेच व्यावसायिकांचे लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. अजूनही येथील परिस्थिती सावरलेली नाही. यामुळे येथील नागरिकांना आणि व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे करावे लागत आहे. येथील औषध विक्रेत्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुरात नुकसान झालेल्या औषध विक्रेत्यांना नुकसान झालेल्या औषधांचे काय करायचे? याबाबत अद्यापही शासनाकडून निर्देश आले नाही. तर पुरामध्ये भिजूनही व्यवस्थित असणाऱ्या औषधांचे काय करायचे? असे पेच निर्माण झाला आहेत. यामुळे शासनाकडून पुरपरिस्थितीमध्ये भिजलेल्या औषधांबाबत तसेच खराब झालेल्या औषधांच्या विल्हेवाट लावण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया औषध विक्रेते कैलास जैन यांनी बोलताना दिली.
हेही वाचा - कोकणासह अतिवृष्टीबाधित भागातून 90 हजार लोकांना जीवदान, 890 गावांना फटका
खराब औषधे विल्हेवाट लावण्यासंदर्भात एक नियोजित प्रक्रिया असते. या प्रक्रियेनुसारच औषधांची विल्हेवाट लावणे निर्बंधित आहे. मात्र, महाड पुरामध्ये खराब झालेल्या औषधांबाबत कोणतेही निर्देश नसल्याने या औषधांचे करायचे काय? असा प्रसन्न निर्माण झाला आहे.