रायगड - 'ज्याचे समुद्रावर वर्चस्व, त्याची जमिनीवर सत्ता' हे लक्ष्य ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधले. या जलदुर्गांची जबाबदारी छत्रपतींनी कान्होजी आंग्रे यांना देऊन मुंबई ते सावंतवाडी पर्यंतच्या मराठा साम्राज्याचे प्रमुख बनवले. तर शाहू महाराज यांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल ही पदवी बहाल केली. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अत्यंत करारी, धैर्यवान, कार्यक्षम कामगिरी करून इंग्रज, पोर्तुगीज, डच या परकीय शक्तीचा ऱ्हास केला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सिद्धी जौहरने मराठा साम्राज्यात हाहाकार माजवला होता. 1699 साली सिद्दी आणि पोर्तुगीज यांनी मुघलांच्या साथीने आंग्रेच्या विरोधात सलोखा केला. त्याला उत्तर देण्यासाठी कान्होजी आंग्रे यांनी मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने तिन्ही शत्रूंचा पराभव करून मराठ्यांच्या सामर्थ्याचा डंका वाजवला. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग येथील कुलाबा किल्ला हे मराठ्यांचे प्रमुख केंद्र बनवले होते. तर सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग हे आपले तळ बसवले.
कान्होजींचे मूळ आडनाव हे सकपाळ होते. पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतातील आंगरवाडी गावाच्या नावावरून आंग्रे हे नाव पडले. कान्होजी आंग्रे यांनी परकीय देशाची गलबते लुटून त्रावणकोर ते मुंबई पर्यंतची सर्व गावे जिंकून ताब्यात घेतली. इंग्रज, पोर्तुगीज, डच यांच्यावर कान्होजी आंग्रे यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते.
सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग शहर वसवले असून त्याचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे आहेत. सध्या ते अलिबागमधील घेरिया या निवासस्थानी राहत आहेत.