रायगड- उशिरा का होईना आंब्याला मोहोर यायला सुरूवात झाली आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले आहे. शिवाय दिवसभर वातावरणात धुरके पसरले आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वातावरण काही दिवस असेच कायम राहिले तर आंबा पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षी लांबलेला पाऊस आणि थंडीला झालेला उशीर यामुळे यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रीया लांबली आहे. उशिरा आलेल्या मोहरामुळे फलधारणेला उशिरा सुरुवात होईल. जिल्ह्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. त्यापैकी 14 हजार हेक्टर क्षेत्र उत्पादन क्षेत्र आहे. दरवर्षी जवळपास २१ हजार मेट्रीक टन आंब्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कारण साधारण 15 नोव्हेंबरपासून आंब्याला मोहर येण्यास सुरुवात होते. परंतु, यंदा पावसाचा मुक्काम लांबला. त्यामुळे अब्यांची परिपक्वता उशिरा येईल.
मागील आठवड्यात थंडीला सुरूवात झाली. थंडी फार नसली तरी हवेत चांगला गारवा निर्माण झाल्याने आंब्याच्या मोहोराचा फुटवा सुरू झाला. मात्र, मागील दोन दिवसात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय वातावरणात दिवसभर धुरके पहायला मिळते आहे. यामुळे बागायतदार धास्तावले आहेत. हे वातावरण असेच कायम राहिले तर येणाऱ्या मोहोराला धोका पोहोचू शकतो. मोहोर उशिरा आल्यास आंबा बाजारात उशिरा येईल. रायगडचा आंबा बाजारात उशिरा आल्यामुळे रायगडच्या आंब्याला अपेक्षित दर मिळेल की, नाही याबाबत साशंकता आहे. योग्य दर मिळाला नाही तर त्यामुळे आंबा बागायतदारांचे उत्पन्न देखील घटण्याची शक्यता आहे.
आंबा मोहोर यायला आताच सुरूवात झाली आहे. परंतु, दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ आहे. हे वातावरण असेच राहिल्यास याचा फटका आंब्याच्या मोहोराला बसू शकतो. मोहोर चांगला येण्यासाठी आता चांगल्या थंडीची गरज आहे. अशी माहिती पांडुरंग शेळके, अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड यांनी दिली.