रायगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूरसह अन्य सहकाऱ्यांना पेणच्या सेतू कार्यालय चालक, मुद्रांक विक्रेत्याकडून रोख दीड लाख रुपये घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. मुद्रांक विक्रेत्याकडून कार्यालय सुरु ठेवण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी त्यांनी मागितली होती.
10 लाख रुपयांची खंडणी : काही दिवसांपासून तालुक्यातील विद्यार्थी दाखले घेण्यासाठी पेण येथील सेतू कार्यालयात गर्दी करत होते. हीच संधी साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मनसेच्या अन्य सहकाऱ्यांसह सेतू कार्यालयासमोर स्टंटबाजी केली. यावेळी फिर्यादी तथा मुद्रांक विक्रेता, माजी नगरसेवक हबीब खोत यांच्यावर दबाव आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पेण तहसील कार्यालय परिसरात गोंधळ घातला होता. यावेळी दबाव निर्माण करण्यासाठी पेण तहसील कार्यालय परिसरात धरणे आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी फिर्यादी तथा मुद्रांक विक्रेता खोत यांच्याकडे त्यांनी 10 लाख रुपयांची खंडणी त्यांनी मागितली.
पोलिसांनी रंगेहात पकडले : त्यानंतर आरोपी संदीप ठाकूर याने हबीब खोत यांना 1 जुलै रोजी राजू पोटे मार्गावरील नारायण निवास येथील कार्यालयात भेटण्यासाठी बोलविले. त्यावेळी त्यांनी खंडणी न दिल्यास तुझा परवाना रद्द करु, अशी धमकी दिली. शेवटी ताडजोडीअंती 2 लाख रुपये देण्याचा ठरले होते. खोत यांची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 11 जुलै रोजी पेणचे उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना पोलिसांनी तक्रार देण्याचे सांगितले. खोत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी 7 च्या सुमारास संदीप ठाकूरसह त्यांच्या सहकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे.
पेण पोलीस ठाण्यात गुन्हा : या प्रकरणी कलम 386, 506, 34 अंतर्गत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.
हेही वाचा - Tribal Youth Beaten : आदिवासींवर अत्याचार वाढला?, छत्तीसगडमध्ये आदिवासी तरुणाला जेसीबीला बांधून मारहाण