रायगड - कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या चारवर पोहोचली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
महाड तालुक्यातील कोकरे येथील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला 4 मे रोजी महाडमधील ग्रामीण रुग्णालयात अन्य आजाराच्या उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यावेळी ही परिचारिका तपासणीसाठी रुग्णाच्या संपर्कात आली होती. 7 मे रोजी या रुग्णाचा माणगाव येथील राठोड रुग्णालयातून आलेला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या परीचारिकेचा स्वॅब देखील पाठवण्यात आला होता. तो अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असल्याने परिचारिकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
ही परिचारिका ज्या व्यक्तीच्या संपर्कात आली आहे, त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महाड शहरातील आढळलेली ही पहिलीच रुग्ण आहे, तर तालुक्यात शेलटोळी, कोकरे आणि बिरवाडी या ठिकाणी आढळलेल्या कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.