रायगड - पनवेलमध्ये एका प्रेमीयुगुलाने २ वर्षाच्या मुलीसह विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे तर प्रेमीयुगुलाला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याहूनही गंभीर म्हणजे महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली व त्यानंतर या दोन्ही प्रेमीयुगुलाने केरळमधून पळ काढला.
केरळ येथील संतापूरमधील मशरूम हार्ट फार्म कंपनीत काम करणाऱ्या विवाहीत लिजी कुरियन (वय २९) हिचे त्याच कंपनीत काम करणाऱ्या वसिम अब्दुल कादीर (वय ३५) याच्याबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. लिजी कुरियन आणि तिचा पती रिजोश यांना दोन वर्षांची मुलगी देखील होती. आपल्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेला पती रिजोश याचा काटा काढण्यासाठी लिजीने आपला प्रियकर वसिम याच्या मदतीने त्याची हत्या केली. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी लिजी ही आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत केरळ सोडून पनवेलमध्ये आली.
गेल्या २ दिवसांपासून ते पनवेलमधल्या समीर लॉजमध्ये राहत होते. ज्या रूममध्ये हे प्रेमीयुगुल राहत होते त्या रूमचा दरवाजा लॉज कर्मचाऱ्याने ठोठावला. मात्र आतून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्याने याबाबत आपल्या मॅनेजरला माहिती दिली. त्यानंतर लॉजचालकांनी त्यांच्याकडील चावीने दरवाजा उघडून रूममध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रेमीयुगुल व २ वर्षीय चिमुकली बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडल्याचे त्यांना आढळून आले. त्यावेळी किटकनाशकाचा उग्र वास रूममध्ये येत होता. त्यामुळे संशयाची पाल चुकचुकल्याने मॅनेजरने तात्काळ पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेत २ वर्षाच्या चिमुकलीचा अंत झाला आहे. तर दोघेही प्रेमीयुगुलांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे.
पती रिजोश याच्या हत्येप्रकरणी प्रियकर वसिम याच्या भावास केरळमधल्या संतापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे या गुन्ह्यात आपणही पोलिसांच्या कचाट्यात सापडले जाऊ, या भीतीने पत्नी लिजी आणि प्रियकर वसिम यांनी 2 वर्षाच्या चिमुरडीला विष पाजले व नंतर दोघांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रेमीयुगुलाच्या या गुन्ह्यात निष्पाप २ वर्षाच्या चिमुरडीचा बळी गेला. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होताना दिसून येत आहे. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक मुसळे यांच्याकडून तपास केला जात आहे.
हेही वाचा- 'प्रदूषणमुक्त' भारतासाठी 11 दिवसांत पनवेल ते कन्याकुमारी सायकल प्रवास