रायगड - रोहा तालुक्यातील भालगाव रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने रोहा, मुरुड, तळाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून दरड काढण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळताना वाहतूक नसल्याने मोठी जिवीतहानी टळली आहे.
दक्षिण रायगडातील रोहा, तळा, माणगाव, महाड, पोलादपूर या तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. तर डोंगर भागातही पावसाचा जोर वाढल्याने डोंगरावरची माती ठिसूळ झाली. आज सायंकाळी रोहा-मुरुड रस्त्यावर भालगावनजीक दरड कोसळली व मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे रोह्याकडे येणारी तर मुरुड- तळ्याकडे जाणारी व येणारी वाहतूक बंद झली. दरड कोसळण्याची माहिती मिळताच पोलीस व बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरड काढण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र वाहतूक सुरू होण्यास काही तासांचा कालावधी लागणार आहे.