रायगड - जिल्ह्यात पावसाने थैमान मांडले असल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुरुड तालुक्यातील साळव येथील डोंगराचा काही भाग कोसळून मातीचा ढिगारा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे मुरुड आणि रोहाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात 48 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रात्रीपासून पावसाने वादळी वाऱ्यासह रौद्ररुप धारण केल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. डोंगर भागातही मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.