रायगड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत अन्वय नाईक याची कोर्लई येथील जमीन स्वतःच्या कुटूंबाच्या नावे कोर्लई ग्रामपंचायतीवर दबाव आणून केली असल्याचा आणि निवडणूक शपथ पत्रात याचा उल्लेख केला नसल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोर्लई येथील जमीन ही रीतसर अन्वय नाईक याच्याकडून रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी विकत घेतली असून नाईक यांच्या नातेवाईकांनी नावावर करून देण्यास परवानगी दिली असल्याची माहिती देऊन किरीट सोमय्या याचा आरोप कोर्लई सरपंच प्रशांत मिसळ यांनी खोडून काढला आहे.
किरीट सोमैय्या यांनी कोर्लई ग्रामपंचायतीला दिली भेट -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी घेतलेल्या कोर्लई येथे 9 एकर जमिनीबाबत आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिली. किरीट सोमय्या यांनी माहिती अधिकारात जागेबाबत ग्रामपंचायतकडे माहिती मागितली होती. ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी किरीट सोमय्या आज आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड महेश मोहिते उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक यांच्याकडून सोमय्या यांनी माहिती घेतली.
मृत व्यक्तीची जमीन नावावर केल्याचा आरोप -
उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असून त्यानी केलेल्या या कृत्याबद्दल मी स्तब्ध झालो आहे. कोर्लई येथे रश्मी ठाकरे आणि मनीष वायकर यांनी अन्वय नाईक यांची 9 एकर जमीन साडेचार कोटीने 2014 रोजी खरेदी केली होती. या जमिनीत 19 घरे असून त्याची किंमत 5 कोटी 23 लाख एवढी आहे. 2019 -20 साली जमिनीवरील घरे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर याच्या नावे करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा गौरवापर करून कोर्लई ग्रामपंचायतीवर दबाव आणून मृत व्यक्तीची जमीन कुटूंबाच्या नावावर जमीन केली असून निवडणूक शपथ पत्रात ही बाब लपवून ठेवली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत आम्ही न्यायालयात जाऊन सर्व व्यवहार जनतेसमोर आणणार आहे असे सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप निरर्थक -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी 2014 साली अन्वय नाईक यांची 9 एकर जमीन खरेदी केली आहे. कायदेशीर पद्धतीने ही जमीन खरेदी केली आहे. 2018 साली अनव्य नाईक हे मृत झाल्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलगी यांनी जमीन आणि घरे नावावर करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार 2019 -20 साली रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावावर मालमत्ता झाली आहे. अशी माहिती कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिली आहे.