रायगड - मुरुड तालुक्यातील काशीद समुदकिनारा हा पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. अलिबागकडे येणारे पर्यटक हा काशीद समुद्रकिनाऱ्याला भेट देणार नाही असं कधी होतच नाही. असा हा सुरुच्या बनाने बहरलेला निसर्गरम्य समुद्रकिनारा परिसर आज पूर्णतः कोलमडून पडलेला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा सुरुच्या झाडांना बसला आहे. त्यापेक्षा सर्वाधिक नुकसान हे सुरुच्या बनात टपरी बांधून पर्यटकांना नाश्ता, जेवण देण्याचा व्यवसाय करणाऱ्या काशीदमधील नागरिकांना बसला आहे.

ज्या टपरीमधून पर्यटकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जायची त्याच टपऱ्या वादळात मोडून पडल्या आहेत. आधीच कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला असताना या वादळाने छोटे व्यवसायिकांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी विनंती शासन आणि प्रशासनाकडे येथील व्यवसायिकांनी केली आहे.काशीद समुद्रकिनारी असलेली उंचच उंच सुरुची झाडे, समोर अथांग फेसळलेला समुद्र असा निसर्ग सौदंर्याने नटलेल्या या समुद्रकिनाऱ्याची मोहनी पर्यटकांना भुरळ पाडीत असते. त्यामुळे काशीद समुद्रकिनारा हा नेहमीच पर्यटकांनी हाऊसफुल्ल असतो. पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या या समुद्रकिनारी काशीद गावातील नागरिकांनी पर्यटकांच्या खाण्यापिण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी टपरी तयार केल्या आहेत. काशीद समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांनाही चांगला रोजगार मिळाला असून, त्यांचेही अर्थार्जन होत आहे. त्यामुळे येथील तरुण हा पर्यटनाच्या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, चक्रीवादळाने त्याची रोजीरोटी चालणाऱ्या टपऱ्यांची वाताहत झाली आहे. कोरोना संकटामुळे आधीच पर्यटन व्यवसायला घरघर लागली असून, काशीद समुद्रकिनाऱ्यावरील व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच आता निसर्ग चक्रीवादळाने व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या टपऱ्यावर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सुरुची झाडे पडून मोडतोड झाली आहे. त्यामुळे छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद, त्यातच वादळ यामुळे येथील व्यवसायिक हा पुरता कोलमडून गेला आहे.
रायगड दौऱ्यावर आलेल्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही काशीद समुद्रकिनारी थांबून येथील परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी येथील व्यवसायिकांशी संवाद साधला होता. यावेळी या व्यवसायिकांच्या झालेल्या नुकसानीचाही पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पर्यटनावर आधारित आमचा व्यवसाय असून त्यावरच आमचे पोट चालते. हा व्यवसाय करण्यासाठी बँका, पतसंस्था यांच्याकडून कर्ज घेतले आहेत. कोरोनामुळे आधीच आर्थिक चणचण त्यात हे चक्रीवादळ येऊन आमचा आधार असलेल्या टपऱ्या कोलमडल्या आहेत. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी अशी मागणी टपरीधारक व्यावसायिक रोहन खोपकर, संचिता कासार यांनी केली आहे.

