रायगड - कर्जत नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष श्वान पथकाची नेमणूक केल्याने आता मोकाट कुत्र्यांच्या दहशतीतून कर्जतकरांची सुटका होणार आहे. यासाठी कर्जत नगर परिषदने विशेष श्वान पथकाला पाचारण केले आहे.
नागरिकांची मागणी -
नगरपरिषद हद्दीत मोकाट कुत्र्यांचा अक्षरशा सुळसुळाट झाला आहे. विशेष करून हे कुत्रे घोळक्याने फिरत असून लहान मुलांवर जीवघेणा हल्ला करत आहे. तसेच पहाटे अंधारात मॉर्निग वॉकला जाणाऱ्या महिला, जेष्ठ नागरिकांवर कुत्रे धावून जातात व मागे लागतात. त्यामुळे त्यांनाही घराबाहेर पडतांना या कुत्र्यांची दहशत जाणवते. या अशा उपद्रव माजवणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकातून जोर धरत होती. याचीच दखल घेत अखेर कर्जत नगर परिषदेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अंबरनाथ येथील एका संस्थेची नेमणूक केली आहे.
निर्बीजीकरण केंद्रात मोकाट कुत्र्यांची रवानगी
श्वान पथक दर आठवड्याला गाडी घेऊन येणार आणि शहरातील सर्व प्रभागात फिरून मोकाट कुत्र्यांना पकडणार आहेत. तसेच यानंतर त्यांना गाडीत कोंबून अंबरनाथ पालिकेने उभारलेल्या निर्बीजीकरण केंद्रात नेणार आहेत. तेथे पकडलेल्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करणार आहेत. या मोहिमेमुळे शहरातील कुत्र्यांचा उपद्रव कमी होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शहरात बहुतांश भागात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी एका लहान मुलावर कुत्र्याने चावे घेऊन गंभीर जखमी केले होते. अशा अनेक घटना घडत आहेत, त्यामुळे लहान मुले - महिला यांना रस्त्यावरून चालतांना फारच भीती वाटते. तसेच रात्रभर कुत्रे मोठं मोठ्याने भुंकत असल्याने निद्रा नाश होतो, अशी तक्रार कर्जतचे रहिवासी दिनेश रावळ यांनी केली होती.
हेही वाचा - ऊर्जा मंत्र्यांच्या बंगल्यात कोट्यवधीचा 'झगमगाट'; भाजपचा आक्षेप
काय म्हणाले आरोग्याधिकारी?
अंबरनाथ येथील संस्थेला मोकाट कुत्रे पकडण्याचे काम देण्यात आले आहे. ते पकडून अंबरनाथ पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रात नेवून या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती कर्जत नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य अधिकारी सुदाम म्हसे यांनी दिली. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण फारच वाढले होते. तेव्हा नगर परिषद हद्दीतील आमराई येथील खुले नाट्यगृहाच्या धूळ खात पडलेल्या रिकाम्या वास्तूत निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले होते. मात्र, आता तेथे नव्याने नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने तसेच अन्य ठिकाणीही जागा उपलब्ध नसल्याने अंबरनाथ निर्बीजीकरण केंद्रात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - कोण अंबादास दानवे? नाव घेऊन तोंड खराब करत नाही- चंद्रकांत खैरे