रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या गोदावरी नदीवरील कळमजे पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे उपविभागीय अभियंता, राज्य महामार्ग, महाड यांनी पत्राद्वारे पोलिसांना कळविले आहे. त्यामुळे कळमजे हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे मुसळधार पावसात प्रवाशांचे हाल होत आहेत.
जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावर वाढलेल्या पाण्याचा, मुसळधार पावसाचा, पडणाऱ्या दरडीचा व धोकादायक पुलांमुळे रस्ता बंद झाल्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमधील कळमजे पूल हा वाहतुकीस धोकादायक असल्याचे राज्य महामार्ग उपविभागीय अभियंता यांनी कळविले. त्यामुळे हा पूल राहदारीस बंद केला आहे.
पुलाच्या दोन्ही टोकाला पोलिसांनी वाहतूक थांबवून ठेवली आहे. गोवा बाजूकडून मुंबईकडे येणारी वाहतूक ही निजामपूर नाका येथून निजामपूर-विळा-सुतार वाडीमार्गे कोलाड अशी वळविण्यात आली आहे. तर मुंबई बाजूकडून येणारी वाहतूक ही कोलाडमार्गे निजामपूर नाका अशी वळविण्यात आली आहे. कळमजे पूल बंद केल्याने प्रवाशांना आता पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.