रायगड - रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रायगडसाठी सुनील तटकरे व मावळसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासाठी शेकापने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे रायगड व मावळमधून जिंकुन आणण्याचे शिवधनुष्य शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लिलया उचलले आहे. यासाठी रायगड व मावळमध्ये शेकापचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत यावेळी शेकापही सामील झाला आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे पारडे जड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षापेक्षा तटकरेच्या प्रचाराचे शेकापकडून नियोजनबद्ध काम सुरू झाले आहे. मावळ व रायगड लोकसभा मतदार संघात शेकापची पावणे पाच लाख मते असून दोन्ही ठिकाणी आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखविला.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचीही निर्णायक मते असून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनीही तटकरे यांना पाठींबा जाहीर केला आहे. मावळ मतदार संघातही पनवेल, उरण, कर्जत, खोपोली, खालापूर, पिपरी येथे शेकापची मते आहेत. त्यामुळे मावळ मतदार संघात शेकापची अडीच लाख मते ही आघाडीच्या उमेदवाराला विजयापर्यंत नेणार आहेत.
शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी रायगड व मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे शिवधनुष्य पेलले असून त्यादृष्टीने हालचाल सुरू केली आहे. त्यामुळे दोन्ही लोकसभा मतदार संघाचे किंगमेकर हे जयंत पाटील ठरतील यात शंका नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा असल्याचेही जयंत पाटील यांनी बोलून दाखविले. त्यामुळे आघाडीला फायदा होईल, मात्र निर्णय हा पक्षाचा असल्याचेही पाटील यांनी बोलून दाखविले.