रायगड - शेकाप कधीही पाठीत खंजीर घुपसत नाही तर दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे. भूमिका बदलण्याची आमची नीती नाही. असा उपरोधिक टोला शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांना मारला. आजही आमची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर मैत्री आहे. ज्या दिवशी मैत्री तोडू तेव्हा समोर येऊन सांगू, असे परखड मत जयंत पाटील यांनी मांडले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा आज 73 वा वर्धापन दिन अलिबाग येथे शेतकरी भवनात साधेपणाने साजरा करण्यात आला. आमदार जयंत पाटील यांनी यावेळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बाबत आपले मत व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशी महाविकास आघाडीचे राज्य प्रस्थापित झाले. शेकापही महाविकास आघाडीत असून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप ही आघाडी आहे. मात्र, काही महिन्यांपासून खासदार सुनील तटकरे आणि आमदार जयंत पाटील यांच्यात सुसंवाद नाही. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, आमची मैत्री आजही आहे. महाविकास आघाडीतील आम्ही घटक पक्ष आहोत. आम्ही कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नाही ती आमची नीती नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले विधानसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आले असले तरी ती कार्यकर्त्यांची आणि माझी चूक आहे. यासाठी मी कोणाला दोष देत नाही. आम्ही याबाबत आत्मचिंतन करू, असेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चाकरमान्यांनी गणेशोत्सवासाठी गावी येऊ नये
मुंबईतून चाकरमानी हा गणेशोत्सव काळात गावी येण्यास आतूर असला तरी या कोरोना काळात त्यांनी गावी येऊ नये, असा सल्ला शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे. गणेशोत्सव काळात गावी येणार असाल तर शासनाने, प्रशासनाने, स्थानिक प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये ही भावना यामध्ये असून येणाऱ्या चाकरमानी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावेत, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.