रायगड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर याच्या नावे मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात असलेल्या जमिनीबाबत चौकशी करून कारवाई करा, या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमैया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आणि सोमय्या यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर किरीट सोमय्या आणि कार्यकर्ते यांनी जोपर्यत चौकशी आदेश जिल्हाधिकारी देत नाही, तोपर्यत रस्त्यावर धरणे करणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः घोटाळा झाल्याचे कबूल केले आहे -
कोर्लई येथे मुख्यमंत्र्यांनी अन्वय नाईक यांच्याकडून 2014 साली 9 एकर जमीन खरेदी केली. ही जमीन रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर याच्या नावे आहे. या जमिनीत 19 घरे आहेत. सादर जमिनीची रक्कम 12 कोटी असताना नाईक यांच्याकडून केवळ 2 कोटी रुपयांना घेतली आहे. त्यामुळे या जमीन खरेदीत घोटाळा झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कबूल केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमैया यांनी कार्यकर्त्याना घेऊन मोर्चा काढला. त्यानंतर कार्यकर्त्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न सोमैया यांनी केला. पोलिसांनी गेट बंद करून शिष्टमंडळाने आत जाण्यास पोलिसांनी विनंती केली. मात्र सोमैया आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी आत न सोडल्याने किरीट सोमैया आणि कार्यकर्ते रस्त्यावरच बसून राहिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती.