खालापूर (रायगड) - खोपोली कोविड रुग्णालय मागील दोन महिने राजकीय वादविवाद आणि प्रशासकीय परवानग्याच्या विलंबमुळे अधांतरी लटकले होते. शेवटी सर्वपक्षीय नेते व येथील जनतेच्या रेट्याने वाद मागे पडला. राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून वरिष्ठ लोकप्रतिनिधी एकत्र येत रुग्णालयाचा मार्ग प्रशस्त झाला. सोमवारी सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत या रुग्णालयाचे उद्घाटन झाले.
रुग्णांवर होणार मोफत उपचार -
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे बोलतांना म्हणाल्या की, हे कोविड हॉस्पिटल खोपोली व खालापूरातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी देवदूत ठरणार आहे.
कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र -
याप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, प्रातांधिकारी वैशाली परदेशी, नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता कांबळे, तहसीलदार इरेश चप्पलवार, मुख्याधिकारी गणेश शेट्टे, पंचायत समिती सभापती वृषाली पाटील यासह पदाधिकारी उपस्थित होते.
50 बेडचे खोपोली डेडीकेटेड कोविड रुग्णालय -
केटीएसपी मंडळ संचलित के.एम.सी. महाविद्यालयाच्या सभागृहात हे 50 बेडचे खोपोली डेडीकेटेड कोविड रुग्णालय कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचारासाठी निर्मिती करण्यात आले आहे. यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर खाटाही उपलब्ध असून चौवीस तास रुग्णांची देखभाल व उपचारासाठी चार डॉक्टर, आठ नर्स व अन्य सेवा देणारा स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे. रुग्णसंख्या वाढल्यास यात वाढ करण्याचे नियोजन ही आहे.
रुग्णालयाच्या माध्यमातून उत्तमोत्तम जनसेवा -
तर या हॉस्पिटलच्या माध्यमातून खोपोलीकरांचे एक प्रमुख स्वप्न पूर्णत्वास आल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. या हॉस्पिटलमधील सर्व सोयीसुविधा कायम राहण्यासाठी व गरजूंना त्याचा उपयुक्त लाभ मिळण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे आमदार थोरवे यांनी सांगितले. तसेच या माध्यमातून उत्तमोत्तम जनसेवा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - ...अन्यथा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करू - खासदार तटकरे