पेण (रायगड) - कोकणातून मुंबईच्या दिशेने कामानिमित्त गेलेल्या व आत्ता कोरोना संकटामुळे मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमान्यांना मोफत रेल्वेची व्यवस्था करून कोकणात आपापल्या घरी जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी यांनी केली आहे.
कोकणातील अनेक नागरीक मुंबईत अडकून पडले आहेत. जीवाच्या भितीने ऊन, वारा व अचानक येणाऱ्या पावसाचा विचार न करता पायी चालत हे सर्व नागरिक कोकणात दाखल होत आहेत. या पायपिटीमुळे व उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांचे हालहाल करण्यापेक्षा त्यांना सुरक्षितपणे कोकणात जाऊ द्या, अशी मागणी देवा पेरवी यांनी प्रशासनाकडे केली आहे.
टाळेबंदीमुळे कोकणातील असंख्य नागरिक मुंबईत अडकून पडले आहेत. मुंबईत वाढणाऱ्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे हे सर्वजण घाबरले आहेत. दहा बाय दहाच्या खोल्यामध्ये अनेकांना वास्तव्य करावे लागत आहे. त्यामुळे जीवाच्या भितीने हे सर्वजण रस्ते मार्ग आणि रेल्वे रुळांवरून चालत निघाले आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने लोक रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत. या पायपिटीत माणगाव, महाडनंतर गुरुवार(14 मे) कांदिवली येथून आदगाव, श्रीवर्धन येथे चालत जात असताना पेण तालुक्यातील खारपाडा येथे रस्त्यावर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे शासनाकडून परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वे आणि बसेस सोडण्यात आल्या, त्याच प्रकारे रेल्वे आणि एस.टी.बसेस मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांसाठी सोडल्या जाव्यात, अशीही मागणी पेरवी यांनी केली आहे.
खासगी गाड्यांचे चालक-मालक कोकणात जाणाऱ्या नागरिकांकडून दसपटीने जादा भाडे घेऊन लूट करत असल्याचा आरोपही पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी यांनी केला असून अशा गाड्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.