रायगड - आपटा येथे बसमध्ये बॉम्ब आढळल्याची घटना ३ दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एटीएस, आयबी या गुप्तचर यंत्रणा टेहळळी करत आहेत. मात्र, जिल्ह्याच्या सुरक्षेच्या बाबतीत ढिसाळपणा सुरू असल्याचे समोर आले आहे.
गुप्तचर यंत्रणांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस दलातर्फे समुद्र किनाऱ्याची टेहळणी केली जात आहे. संशयास्पद हालचालींवर पोलीस नजर रोखून आहेत. मात्र, किती पोलीस तैनात करण्यात आले आहेत याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. पण, एवढी मोठी घटना होऊनही जिल्ह्यात कुठेही तपासणी करण्यात आली नाही.
बॉम्ब ठेवणारा दहशतवादी संघटनेचा हस्तक?
बसमध्ये बॉम्ब ठेवणारा व्यक्ती प्रशिक्षित असल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीने बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आयएसआयएस किंवा दुसऱ्या एखाद्या दहशतवाही संघटनेकडून घेतल्याचे सांगितले जात आहे. रायगडमध्ये मोठा घातपात घडवून आणण्यासाठीच हा बॉम्ब ठेवला असू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.