रायगड - जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे, सखल भागात पाणी साचणे यासारख्या घटना घडल्या आहेत. तर माथेरान आणि खोपोली परिसरात दरड कोसळण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
गेल्या महिन्याभरापासून दांडी मारलेल्या मान्सून अखेर जिल्ह्यात चांगलाच सक्रिय झाला. गुरुवार पाठोपाठ शुक्रवारीही पावासने दमदार बॅटींग केली. पनवेल, पेण, रोहा, महाड, पोलादपुर, अलिबाग, सुधागड पाली येथे पावसाच्या जोर कायम आहे. इतर उरण, मुरुड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा, माणगाव परीसरातही पावसाची संततधार सुरुच होती. या पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे यासारख्या घटना घडल्या. नेरळ माथेरान घाटात दरड कोसळली. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली. खोपोली येथील कमला रेसिडेन्सी परीसरातही डोंगरावरून दगड खाली कोसळले. त्यामुळे काही काळ या परीसरात भितीचे वातावरण होते. आंबेनळी घाटात गुळ आणि साखर घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला. चालक आणि क्लिनरने ट्रकमधून वेळीच उडी मारल्याने ते दोघही बचावले.
जिल्ह्यातील नद्याही वाहू लागल्या असून नागोठणेमधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र, आज सकाळी पाण्याची पातळी कमी झाली आहे.
जिल्ह्यातील पावसाची सरासरी -
गेल्या २४ तासात सरासरी १९७.४६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. खालापूर येथे सर्वाधिक ३८५ मिमी नोंद झाली. त्यापाठोपाठ माथेरान ३४७ मिमी, कर्जत २८७.१० मिमी, पेण २८०.४० मिमी, पनवेल २७१.८० मिमी, रोहा २४० मिमी, माणगाव १९६ मिमी, महाड १९५ मिमी, पोलादपूर १६१ मिमी, तळा १५५ मिमी, म्हसळा १४५ मिमी, श्रीवर्धन, मुरुड १४२ मिमी, सुधागड १२० मिमी, तर उरण ९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान येत्या २४ तासात जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.