रायगड - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 177.69 मिमी पाऊस झाला असून पावसाची बॅटिंग अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, यामुळे अनेक ठिकाणी दरड, झाडे कोसळून रस्ते व रेल्वे मार्ग बंद झाले होते. दरड व झाडे काढल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली असली तरी पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असल्याने पुणे येथून एनडीआरएफची दोन पथकं जिल्ह्यात पनवेल येथे दाखल झाली आहेत. दुपारी 3 वाजता समुद्राला भरती असल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सतर्क राहून योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे प्रशासनाकडून वर्तविण्यात आले आहे.
जिल्ह्यात गणेशोस्तव साजरा होत असतानाच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून पुन्हा एकदा 2 ऑगस्ट सारखी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, पावसाच्या जोराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ताम्हणी घाटात पडलेली दरड काढली असल्याने वाहतूक सुरू झाली आहे. भिसे खिंड व सुकेळी खिंडीत पडलेली दरड व झाड काढल्याने येथील वाहतूकही सुरू झाली आहे. रोहा अष्टमी दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळली असल्याने अर्धा तास कोकण रेल्वे सेवा कोलमडली होती. दरड काढल्यानंतर पुन्हा रेल्वेसेवा सुरू झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी पुलावरून पाणी गेले असल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्ह्यात पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना गावांमध्ये जाऊन आढावा घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. सर्व विभागाचे अधिकारी यांना तत्काळ मदत कार्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यातील खाजगी शासकीय विभागाच्या बोटी आणि पथक तयार ठेवण्यात आले आहे, एनडीआरएफची टीम बोलाविण्यात आली आहे. पुढील 48 तास जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असल्याने सर्व विभाग व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.